सांजवार्ता ऑनलाईन Mar 05, 2020
औरंगाबाद : विश्रांती नगर वॉर्डातून इच्छुक असलेल्या भाजप नगरसेविका सत्यभामा शिंदे यांना भाजपने नकार कळवताच त्यांनी सेनेत जाण्याची तयारी केली आहे. माजी नगरसेवक व पती दामू अण्णा शिंदे यांच्यासह त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. ठाकरे नगर एन -2 वार्ड राखीव झाल्याने वॉर्डाच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी भाजपकडे विश्रांती नगर वॉर्डातून उमेदवारी मागितली होती. गेल्या दहा वर्षापासून दामू अण्णा शिंदे आणि सत्यभामा शिंदे या ठाकरे नगर वार्डाचे नेतृत्व करतात. यावेळी ठाकरे नगर वार्ड राखीव झाल्याने त्यांनी विश्रांती नगर वॉर्डातून निवडणूक लढवण्याची तयारी केली. गेल्या महिनाभरापासून त्यांनी या वार्डासाठी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र भाजपने त्यांना नकार कळविल्यसाचे समजते. त्यामुळे नाराज दामू आण्णा शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोशल मीडिया वरून त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. शिवसेना विश्रांती नगरातून उमेदवारी देत असल्याने आपण भाजपला रामराम ठोकत असल्याचे स्पष्ट केले आहे.